प्रतिनिधी: पुरुषोत्तम जगदाळे,
सातारा जिल्ह्यातील भुईंज येथील माता महालक्ष्मी नवरात्रोत्सव यात्रा यंदाही मोठ्या उत्साहात आणि पारंपारिक पद्धतीने संपन्न झाली. महाराष्ट्रातील मोठ्या यात्रांपैकी एक म्हणून या यात्रेकडे पाहिले जाते. यंदा ग्रामीण भागावर दुष्काळाचे सावट असतानाही भाविकांच्या उत्साहात कोणतीही कमतरता नव्हती.
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी भोसले पाटील कुटुंबाच्या प्रमुख उपस्थितीत घटस्थापना करून उत्सवाला प्रारंभ झाला. दहा दिवस मंदिरात विविध रूपातील आकर्षक पूजा मांडण्यात आली होती. ही पूजा श्रीपूजक प्रसाद गुरव आणि श्रीपूजक संकेत किर्वे यांनी केली.
विजयादशमी हा यात्रेचा मुख्य दिवस असतो. या दिवशी पहाटे होम हवन आणि विधिवत पूजा करून मानकऱ्यांच्या उपस्थितीत घट उठविण्यात आला. सायंकाळी पाच वाजता देवीची पालखी सीमोल्लंघनासाठी मार्गस्थ झाली. ग्रामप्रदक्षिणा झाल्यानंतर गावाच्या शिवेवर सोने लुटण्याचा पारंपारिक कार्यक्रम पार पडला. त्यानंतर रात्री उशिरा निघालेला देवीचा छबिना दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत संपूर्ण गावातून फिरून मुख्य मंदिरात विसर्जित झाला.
या दहा दिवसांच्या कालावधीत सामाजिक प्रबोधनपर कार्यक्रमांसह राज्यस्तरीय कबड्डी आणि व्हॉलीबॉल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. गावाच्या प्रवेशद्वारावर व्यापारी मंडळ सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने भव्य कार्यक्रम घेण्यात आले. या काळात दररोज १५ ते २० हजार भाविकांनी देवीचे दर्शन घेतले.
यावेळी पंचायत समिती सदस्या तथा भाजप सातारा जिल्हाध्यक्षा सुरभीताई भोसले यांनी यात्रेच्या परंपरेबद्दल माहिती दिली. युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुधीरआबा भोसले पाटील यांनी मंदिरातील पूजा विधी आणि क्रीडा उपक्रमांबद्दल माहिती दिली.
यात्रोत्सवादरम्यान माजी आमदार मदनदादा भोसले, भैय्यासाहेब जाधवराव, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गजानन बापू भोसले, माजी सरपंच प्रशांतजी जाधवराव, सूर्यकांत दादा शेटे, उद्योगपती चेतनजी गाडे, निवृत्त विक्रीकर अधिकारी पोळ साहेब, डॉ. जय पवार आदी मान्यवर उपस्थित होते.




राज्यात लवकरात लवकर चांगला पाऊस पडावा आणि बळीराजा सुखी व्हावा यासाठी समस्त ग्रामस्थांच्या वतीने देवीकडे विशेष प्रार्थना करण्यात आली.